रायगड - स्वदेशी उत्पादनांना नवी ओळख; गोरेगावात ‘अमृत पेठ’ यशस्वी
रायगड, 29 जून (हिं.स.)। महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ गोरेगाव (ता. माणगाव) येथे उत्साहात संपन्न झाली. स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट
New-identity-for-indigenous-pr


रायगड, 29 जून (हिं.स.)। महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ गोरेगाव (ता. माणगाव) येथे उत्साहात संपन्न झाली. स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संबोधी बौद्ध विहार येथे २७ व २८ जून रोजी सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत भरलेल्या या बाजारपेठेत रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील उद्योजकांनी सहभाग घेतला होता. घरगुती पिठे, मसाले, हस्तकला वस्तू, इमिटेशन दागिने, विणकामाच्या वस्तू, आयुर्वेदिक उत्पादने, महिलांसाठी हाताने तयार केलेल्या पर्स, सोलर उपकरणे तसेच स्वदेशी दुचाकी आदी विविध उत्पादनांचे स्टॉल ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.

या बाजारपेठेचे उद्घाटन डॉ. नंदकुमार मराठे, गोरेगावचे सरपंच जुबेर अब्बासी आणि विकास गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. मराठे यांनी उद्योजकांशी संवाद साधताना ग्रामीण भागात अधिकाधिक उत्पादक निर्माण होण्याची गरज व्यक्त केली. अमृत संस्थेच्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग उभारून स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनावे, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

अमृत संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, लघुउद्योगांना चालना आणि स्वयंरोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाजारपेठेतील लकी ड्रॉ हा विशेष आकर्षणाचा विषय ठरला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक शैलेश मराठे, उपव्यवस्थापक मंगेश ढेबे, अमृतसखी जान्हवी साठे तसेच स्थानिक अमृत मित्र सुयश मोने आणि अनुश्री ताई यांनी विशेष परिश्रम घेतले. स्थानिक उद्योजकांसाठी ‘अमृत पेठ’ हा उपक्रम व्यवसायवृद्धीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरल्याची भावना सहभागी उद्योजकांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande