

रायगड, 29 जून (हिं.स.) :नेरळ ग्रामपंचायतीकडून नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शिवसेना उपशहर प्रमुख तथा श्रीराजेंद्रनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष संदीप नारायण उतेकर यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदन सादर करून पाणीपुरवठा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
उतेकर यांनी दिलेल्या निवेदनात पावसाळ्यापूर्वी पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक असलेला टीसीएल (TCL) निर्जंतुकीकरण पदार्थ उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना गढूळ व अपुरे शुद्धीकरण झालेले पाणी पुरवले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. यासोबतच पाण्याच्या खराब गुणवत्तेचे छायाचित्रेही निवेदनासोबत जोडण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नेरळ ग्रामपंचायत सध्या प्रशासकीय कारभाराखाली असून नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात पाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रभावीपणे राबवली जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रामसभेत शुद्ध पाणीपुरवठ्याबाबत ठराव मंजूर असूनही त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आरोग्य धोके टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात ग्रामपंचायतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत अवगत करून तातडीने टीसीएलची उपलब्धता करावी, तसेच पाणी शुद्धीकरणाची नियमित प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत पंचायत समिती कर्जतचे सभापती आणि गटविकास अधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)