
लातूर, 29 जून (हिं.स.)। दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या लातूर महानगरपालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
महापालिकेतील 1,200 हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले असून, दोन महिन्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. वेतन न मिळाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाल्याचे आंदोलकांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न झाल्याने अखेर ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले. थकीत वेतन तातडीने अदा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे महापालिकेच्या काही कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis