
लातूर, 29 जून (हिं.स.)।
लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथील अल्पभूधारक विधवा शेतकरी महिलेच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढावले असताना लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी मानवतेचा परिचय देत वैयक्तिकरित्या ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. याशिवाय शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
लातूर तालुक्यातील मौजे बोरगाव काळे येथील ७५ वर्षीय भागीरथीबाई भानुदास पवार या अल्पभूधारक शेतकरी असून, त्या आपल्या दोन मूकबधिर दिव्यांग मुलांच्या—हनुमंत पवार आणि दत्ता पवार—सहाय्याने स्वतःची तसेच इतर शेतकऱ्यांची शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आयुष्यभर संघर्ष करत संसार उभा केला आहे.
सध्या खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू असताना त्यांच्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला बैल अचानक विषबाधेमुळे दगावला. बैलाच्या मृत्यूमुळे पेरणीची कामे ठप्प झाली असतानाच कुटुंबाच्या उत्पन्नाचा आणखी एक आधार असलेली दुधाळ म्हैसही विषबाधेमुळे मृत्यूमुखी पडली. त्यामुळे दूध विक्रीतून मिळणारे उत्पन्नही बंद झाले आणि आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या या कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले.
भागीरथीबाई पवार यांनी सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर दोन मूकबधिर मुलांचा सांभाळ करत अत्यंत कष्टाने संसार चालवला आहे. शेतीमजुरी आणि जनावरांच्या आधारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून, बैल आणि म्हैस दगावल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे राहिले आहे.
या घटनेची माहिती मिळताच आमदार रमेशआप्पा कराड यांनी रविवारी लातूर येथील भारतीय जनता पक्षाच्या संवाद कार्यालयात भागीरथीबाई पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी वैयक्तिक निधीतून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ, आवश्यक आर्थिक मदत आणि प्रशासनामार्फत शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पवार कुटुंबातील हनुमंत पवार, दत्ता पवार यांच्यासह भाजपाचे दशरथ सरवदे, प्रशांत साखरे, बाबासाहेब काळे, सूर्यकांत सोनवणे, खंडू आवटे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis