परभणीत ३० जूनपासून प्रत्यक्ष मतदार पडताळणी; एसआयआर मोहिमेसाठी प्रशासन सज्ज
परभणी, 29 जून (हिं.स.)। जिल्ह्यात दि. ३० जूनपासून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदार पडताळणीची मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून यंदा दिव्यांग, तृतीयपंथी आणि आदिवासी मतदारांसाठी विशेष
परभणीत ३० जूनपासून प्रत्यक्ष मतदार पडताळणी; एसआयआर मोहिमेसाठी प्रशासन सज्ज


परभणी, 29 जून (हिं.स.)।

जिल्ह्यात दि. ३० जूनपासून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदार पडताळणीची मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून यंदा दिव्यांग, तृतीयपंथी आणि आदिवासी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व बीएलओंना मागील आठवडाभरापासून प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली. यावेळी निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी उदयसिंह चव्हाण तसेच जनसंपर्क अधिकारी गणेश शिंदे उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, एसआयआरचा मुख्य उद्देश पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवणे आणि अपात्र मतदारांची नावे वगळणे हा आहे. यासाठी बीएलओ प्रत्येक मतदाराला दोन अर्ज देतील. त्यापैकी एका अर्जावर बीएलओची स्वाक्षरी असेल. हा अर्ज पुरावा म्हणून मतदार स्वतःकडे ठेवू शकतील. अर्ज हरवू नयेत किंवा त्यांची अदलाबदल होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.या प्रक्रियेत प्रत्येक अर्जावर स्वतंत्र क्यूआर कोड देण्यात आला असून त्याद्वारे संबंधित मतदाराची ओळख आणि माहिती सहज पडताळता येणार आहे. मतदारांची माहिती २००२ मधील नोंदी तसेच अद्ययावत २०२५-२६ च्या मतदार यादीतील नोंदींशी पडताळली जाणार आहे. ज्यांची माहिती या नोंदींशी जुळेल, त्यांना कोणतीही नोटीस दिली जाणार नाही किंवा सुनावणीसाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.मात्र, ज्यांची पूर्वीची माहिती उपलब्ध नसेल, त्यांनी आई-वडील, आजी-आजोबा किंवा इतर नातेवाईकांची पूर्वीच्या मतदार यादीतील नोंद सादर करणे आवश्यक राहील. अर्जामध्ये मतदाराचे नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदार ओळख क्रमांक, आई-वडील किंवा नातेवाईकांचे नाव, त्यांच्याशी असलेले नाते, विधानसभा मतदारसंघ, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक यांची माहिती भरावी लागणार आहे.*दुबार नावांवर विशेष लक्ष*एसआयआर मोहिमेदरम्यान एखाद्या मतदाराचे नाव शहर आणि ग्रामीण भाग अशा दोन ठिकाणी असल्यास संबंधित मतदाराला दोन्ही ठिकाणी नोटीस बजावली जाईल. त्यानंतर सुनावणी घेऊन एका ठिकाणचेच नाव मतदार यादीत कायम ठेवले जाईल. जर मतदाराने दुबार नावाची माहिती दिली नाही, तर बीएलओ अॅपच्या माध्यमातून ती माहिती समोर येईल. त्यामुळे दुबार नावे असलेल्या मतदारांनी खरी व अचूक माहिती देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande