पोलीस आपल्या सोसायटीमध्ये' उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
लातूर, 29 जून (हिं.स.)। पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास, संवाद व सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पोलीस आपल्या सोसायटीमध्ये या अभिनव उपक्रमाला १५ दिवस पूर
पोलीस आपल्या सोसायटीमध्ये अभियान


लातूर, 29 जून (हिं.स.)। पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास, संवाद व सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पोलीस आपल्या सोसायटीमध्ये या अभिनव उपक्रमाला १५ दिवस पूर्ण झाले असून, या उपक्रमाला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. दि. १५ जून २०२६ पासून सुरू झालेला हा उपक्रम शहरी भागातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या त्यांच्या परिसरात जाऊन जाणून घेण्यासाठी आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदार नियोजित वेळापत्रकानुसार विविध सोसायट्या, कॉलनी व निवासी परिसरांना भेट देत आहेत. पोलीस आपल्या परिसरात येत असल्याने नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून, वाहतूक, कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, सायबर फसवणूक, व्यसनमुक्ती, अवैध धंदे, रात्रीची गस्त, सीसीटीव्ही, पार्किंग तसेच इतर स्थानिक प्रश्न पोलीस प्रशासनासमोर थेट मांडत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत सकारात्मक सूचना व अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत.

भेटीदरम्यान नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, दामिनी पथकाच्या सेवा, डायल ११२ आपत्कालीन सेवा, पेट्रोलिंग दरम्यान पोलीस क्यूआर कोडचा वापर , तसेच नवीन फौजदारी कायद्यांनुसार ६० व ९० दिवसांच्या कालमर्यादेत तपास पूर्ण करण्याची तरतूद याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता वाढत असून पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होत आहे.

या उपक्रमामुळे पोलीस व नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी झाला असून, समस्या तातडीने समजून घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये हा उपक्रम लोकाभिमुख, विश्वासार्ह आणि काळाची गरज असल्याची भावना निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी नागरिकांनी हा उपक्रम नियमितपणे सुरू ठेवण्याची मागणीही केली आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत लातूर शहर व परिसरातील १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ३२० ठिकाणी भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी अवघ्या १५ दिवसांत सुमारे ७५ ठिकाणी भेटी देण्यात आल्या आहेत. उर्वरित सर्व भेटी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यात येणार आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरातील कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, अमली पदार्थ, अवैध धंदे किंवा इतर कोणत्याही समस्यांबाबत पोलिसांशी निर्भयपणे संवाद साधावा. नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य हेच सुरक्षित, सक्षम समाजनिर्मितीचे खरे बळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande