
रायगड, 29 जून (हिं.स.) : रायगड जिल्ह्यात सोमवारी वटपौर्णिमेचा सण मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. अलिबाग, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, पेण, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि सुधागड तालुक्यांतील मंदिर परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वडाच्या वृक्षांजवळ सकाळपासूनच विवाहित महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
पारंपरिक नऊवारी साडी, दागिने आणि फुलांनी सजलेल्या महिलांनी वडाच्या वृक्षाचे विधिवत पूजन करून त्याला पवित्र धागा गुंडाळत फेऱ्या मारल्या. अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी महिलांनी मनोभावे प्रार्थना केली. विविध मंदिरांमध्ये पूजा, आरती, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींमुळे दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.सावित्रीने आपल्या निष्ठा, धैर्य आणि पतिव्रतेच्या बळावर सत्यवानाला यमाच्या तावडीतून परत आणल्याच्या पौराणिक कथेनिमित्त महिलांनी वटसावित्री व्रत श्रद्धापूर्वक पाळले. या परंपरेतून भारतीय संस्कृतीतील पतिव्रता, कुटुंबनिष्ठा आणि कौटुंबिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.ग्रामीण भागातील मंदिरांबरोबरच शहरांतील सार्वजनिक वडाच्या वृक्षांजवळही महिलांची मोठी उपस्थिती दिसून आली. पूजा-अर्चेनंतर महिलांनी एकमेकींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत भारतीय संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपण्याचा संदेश दिला. आधुनिक जीवनशैलीच्या प्रभावातही वटपौर्णिमेसारख्या पारंपरिक सणांबाबत रायगड जिल्ह्यातील महिलांमध्ये असलेली श्रद्धा आणि उत्साह कायम असल्याचे चित्र यंदाही पाहायला मिळाले. श्रद्धा, संस्कृती आणि कौटुंबिक मूल्यांचा संगम घडवणारा हा सण संपूर्ण जिल्ह्यात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)