
पुणे, 29 जून (हिं.स.)राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय (भारत सरकार) पुरस्कृत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह-सुविधा केंद्र (RCFC-WR), वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘देशी वनस्पती रोपे निर्मिती’ या विषयावरील चौथी कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यापीठातील औषधी वनस्पती उद्यान येथे या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
औषधी व देशी वनस्पतींचे संवर्धन, त्यांचे वैज्ञानिक पद्धतीने संगोपन आणि गुणवत्तापूर्ण रोप निर्मितीचे कौशल्य प्रशिक्षणार्थींमध्ये विकसित करणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
कार्यशाळेत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह-सुविधा केंद्राचे मुख्य संशोधक प्रा. (डॉ.) दिगंबर मोकाट यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष कृती आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रकल्प व्यवस्थापक डॉ. टी. डी. खरात यांनी विविध देशी वृक्षांच्या बियाण्यांची ओळख करून देत त्यांचे महत्त्व विशद केले.
प्रा. (डॉ.) मोकाट यांनी रोपवाटिका व्यवस्थापनातील विविध महत्त्वपूर्ण बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये सपाट, खोलगट आणि गादी वाफ्यांची वैज्ञानिक पद्धतीने निर्मिती, बियाणे संकलन, सुप्त अवस्था, वर्गीकरण आणि दीर्घकालीन साठवणूक यासंदर्भातील माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. याशिवाय नर्सरीसाठी योग्य कंटेनरची निवड, माती व खतांचे योग्य मिश्रण तयार करणे, जैविक खते आणि कीडनाशकांचा वापर, तसेच पाणी आणि ताण व्यवस्थापनाच्या तंत्रांचे सादरीकरण करण्यात आले.
रोपांची निगा, त्यांची वाढ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून औषधी व देशी वनस्पतींची लागवड कशी करावी, याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. बियाणे पेरणी, नर्सरी व्यवस्थापन आणि रोप संगोपनाच्या विविध पद्धती प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष अनुभवता आल्या.
तसेच वृक्ष लागवडीसाठी योग्य आकाराचा खड्डा तयार करणे, त्यामध्ये माती व खतांचे योग्य मिश्रण भरणे, वृक्ष लागवड करणे आणि लागवडीनंतर पाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी आळे तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आले.
कार्यशाळेदरम्यान सुमारे १०० प्रकारच्या वृक्षांच्या बियाण्यांचे आणि वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात औषधी व देशी वनस्पती संवर्धनात रुची असलेल्या सुमारे ३० शेतकरी, नागरिक, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यशाळेतील सर्व प्रात्यक्षिके प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाल्यामुळे भविष्यात स्वतःची रोपवाटिका यशस्वीपणे उभारण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास उपस्थित प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु