
रत्नागिरी, 29 जून (हिं.स.) । रोटरी क्लबतर्फे हे वर्ष ‘कर्तव्याचा जागर महोत्सव’वर्ष म्हणून साजरे होणार आहे. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या सत्तराव्या पदग्रहण सोहळ्यात याबाबतची घोषणा करण्यात आली.
सोहळ्यात ॲड. मनीष नलावडे यांची अध्यक्षपदी निवड झाली. पुण्यातील रोटरी जिल्हा ३१३१च्या माजी जिल्हा गव्हर्नर मंजू फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. आनंद चौगुले यांची सचिवपदी, तर धीरज वेल्हाळ यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली.
मंजू फडके यांनी रोटरीची विचारसरणी, नेतृत्वगुण आणि समाजसेवेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. “तुम्हीच तुमचे आणि तुमच्या संस्थेचे खरे ब्रँड प्रतिनिधी असता,” असे सांगत त्यांनी प्रत्येक सदस्याने आपल्या कृतीतून संस्थेची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे आवाहन केले. रोटरीमध्ये अशाच व्यक्ती एकत्र येतात, ज्यांना समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची आवड आणि तळमळ असते. एकट्याने काम करण्यापेक्षा संघभावनेने एकत्र येऊन कार्य केल्यास समाजात मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणता येतो; या भावनेतून रोटरी सदस्य कार्यरत असतात, असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी नेतृत्वकौशल्याचे महत्त्व स्पष्ट केले. माणूस तोच असतो; मात्र तुम्ही त्याच्याकडून काम कसे करून घेता, यावर तुमचे कौशल्य आणि त्या व्यक्तीचे कार्यपरिणाम अवलंबून असतात, असे सांगत त्यांनी प्रभावी संवाद, प्रेरणा आणि संघभावना यांचे महत्त्व विशद केले.
नूतन अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे यांनी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या ७० वर्षांच्या गौरवशाली परंपरेला नवी दिशा देण्याचा संकल्प व्यक्त केला. रोटरी इंटरनॅशनलच्या “Create Lasting Impact” आणि डिस्ट्रिक्टच्या “Team Phoenix” या संकल्पनांना अनुसरून रोटरी वर्ष २०२६-२७ हे “कर्तव्याचा जागर महोत्सव” म्हणून साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. हे केवळ एक रोटरी वर्ष नसेल, तर सेवा, संस्कार, विकास आणि उत्साहाचा अखंड उत्सव असेल, असे त्यांनी सांगितले. रोटरीच्या सात प्रमुख सेवा क्षेत्रांमध्ये शांतता प्रस्थापना, रोगप्रतिबंधक उपाय, स्वच्छ पाणी व स्वच्छता, माता व बाल आरोग्य, शिक्षण व साक्षरता, आर्थिक विकास आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर आगामी वर्षात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ७० विद्यार्थी दत्तक योजना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या आवश्यक गरजांसाठी मदत करण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी पाच एकर जागेत वृक्षलागवड, खारफुटी संवर्धन आणि किनारी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच रोजगारनिर्मितीसाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) सहकार्याने खेकडा संवर्धन, शिंपले संवर्धन, मुसल संवर्धन, मासे मूल्यवर्धन, शोभिवंत मासे पालन आणि समुद्री शेवाळ संवर्धन, शेती आणि पर्यावरण संवर्धनासाठी श्री पद्धतीच्या शेतीचे मॉडेल उभारणे, युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती, गावोगावी आरोग्य शिबिरे आयोजित करून नागरिकांना आरोग्य तपासणी व मार्गदर्शन, ३० ऑगस्ट रोजी ‘रेन रन’उपक्रम आयोजित करून आरोग्य, तंदुरुस्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणे, तसेच रत्नागिरीच्या पर्यटन विकासासाठीही विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
युवकांमध्ये नेतृत्वविकासासाठी रोटरॅक्ट क्लबला अधिक बळकटी देण्यात येणार असून, रोटरीची सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवीन क्लब स्थापनेचाही संकल्प करण्यात आला आहे. यावेळी रत्नागिरीतील १८ वर्षांवरील युवक-युवतींना रोटरॅक्ट क्लबमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. इच्छुक विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या मुलाखती घेऊन त्यांना रोटरॅक्ट क्लबमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
पदग्रहण सोहळ्यास रत्नागिरीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिक, रोटरीचे विद्यमान व माजी पदाधिकारी, सदस्य तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी