
सोलापूर, 29 जून (हिं.स.) | श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) परिसर मध्ये अंतर्गत रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यामुळे रुग्णांना होणाऱ्या त्रासाबाबत व नव्याने सी.सी रस्ते तयार करण्यात यावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले यांनी सिविल रुग्णालयात स्टेचरवर झोपून रुग्णाला होणारे त्रास शासनाला कळावे व जाग यावी म्हणून लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शहर, जिल्हा तसेच राज्यातील विविध भागांतून हजारोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये गरीब, होतकरू नागरिक, वीटभट्टी कामगार, बांधकाम कामगार, जेकॉब कामगार, मिल कामगार आदींचा समावेश आहे. रुग्णांना एक्स-रे, सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन तसेच इतर वैद्यकीय तपासण्यांसाठी एका विभागातून दुसऱ्या विभागात ने-आण करावी लागते.
मात्र, हॉस्पिटल परिसरातील सर्व रस्ते अत्यंत खराब झाले असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्ट्रेचरवरून नेण्यात येणाऱ्या रुग्णांना व प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना प्रचंड वेदना व त्रास सहन करावा लागत असून अतिशय गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिकेतून सिव्हिल मध्ये जलद गतीने आणताना सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे खड्ड्यातील पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे जर यामध्ये रुग्ण दगावल्यास सिविल प्रशासन जबाबदार असेल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलेला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पडवळ, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले आदी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड