
अमरावती, 29 जून (हिं.स.) | नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ३० जून पासून होणार असून पाठ्यपुस्तकांसोबतच इंधन दरवाढीचा परिणाम पालकांच्या खिशावर होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती, वाहनांच्या देखभालीचा वाढलेला खर्च आणि विविध शासकीय नियमांचे पालन करण्यासाठी होणारा अतिरिक्त खर्च यामुळे अमरावती शहर व ग्रामीण भागातील स्कूल व्हॅन आणि बस चालक भाड्यात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याने पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
अमरावती शहर आणि परिसरात सुमारे ६०० हून अधिक स्कूल व्हॅन व बस दररोज हजारो विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करतात. काही वाहने खासगी शाळांच्या मालकीची आहेत, तर बहुतांश वाहने खासगी चालकांकडून चालविली जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच पेट्रोल डिझेल मध्ये दरवाढ झाल्यानंतर वाहतूक भाडेवाढीची चर्चा सुरू झाल्याने अनेक पालक आर्थिक ताणाखाली आले आहेत.
वाहतूक व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, केवळ इंधनच महाग झालेले नाही, तर वाहनांचे पासिंग, विमा, फिटनेस, देखभाल, दुरुस्ती आणि चालकांचे वेतन यासह सर्व खर्चात मोठी वाढ झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस, फायर एक्स्टिंग्विशर आणि इतर सुरक्षा सुविधा अनिवार्य असल्याने त्यासाठीही अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. शालेय विद्यार्थी वाहतूक संघाचे अध्यक्ष बंडू कंपिलकर यांनी सांगितले की, दरवर्षी वाढणाऱ्या खर्चामुळे जुन्या दरात सेवा देणे शक्य होत नाही. त्यामुळे काही प्रमाणात भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकांसोबत चालकांवरही वाढला नियमांचा ताण
अंबानगरी शालेय वाहतूक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गुल्हाने यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे लागते. या सर्व खर्चासोबतच यावर्षी इंधन दरवाढीमुळे आर्थिक ताण अधिक वाढला आहे. त्यामुळे भाडेवाढीशिवाय पर्याय नाही. वाहतूक संघटनांच्या अंदाजानुसार, कठोरा ते इर्विन चौक या मार्गावरील सध्या सुमारे १,५०० रुपये असलेले मासिक भाडे १,८०० रुपयांपर्यंत जाऊ शकते. तसेच बडनेरा ते इर्विन चौक मार्गावरील १,२०० रुपयांचे भाडे १,५०० रुपयांपर्यंत भाडे द्यावे लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी