
रायगड, 29 जून (हिं.स.)। भारतीय डाक विभागाच्या वतीने महाड शहरातील नवीपेठ येथे पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावर योग्य जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. यासाठी इच्छुक जागा मालकांनी लेखी अर्ज सादर करण्याचे आवाहन रायगड विभागाचे डाक अधीक्षक, अलिबाग यांनी केले आहे.
डाक विभागाला नवीपेठ परिसरात सुमारे ३०० ते ५५० चौरस फूट क्षेत्रफळाची सुव्यवस्थित जागा आवश्यक आहे. इच्छुकांनी अपेक्षित मासिक भाड्याचा उल्लेख करून आपले लेखी अर्ज अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग या पत्त्यावर दि. ६ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोस्ट ऑफिससाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या जागेत स्वतंत्र वीज मीटर, पाणीपुरवठा, स्वच्छतागृह, स्नानगृह तसेच इतर मूलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच डाक विभागाने सुचविलेल्या आवश्यक सुधारणा व दुरुस्त्या जागामालकाने स्वतःच्या खर्चाने करून द्याव्या लागतील. या कामासाठी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे आगाऊ (एडव्हान्स) अनुदान किंवा रक्कम देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, निवड झालेल्या जागेसाठी पाच वर्षांच्या कालावधीचा भाडेकरार जागामालकाने स्वतःच्या खर्चाने करून घ्यावा लागणार आहे. महाड शहरातील योग्य जागा उपलब्ध करून देण्यास इच्छुक असलेल्या मालकांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय डाक विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)