
सोलापूर, 29 जून (हिं.स.)शहरात झालेल्या पहिल्याच दमदार पावसानंतर अनेक भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या असून, पावसाळी पूर्वतयारीतील त्रुटींवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांनी तातडीने पुढाकार घेत शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर कोंड्याल पाणी तुंबलेल्या परिसरांसह प्रमुख रस्ते, नाले, जलनिस्सारण व्यवस्था आणि सुरू असलेल्या पावसाळी कामांचा आढावा घेणार आहेत. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा अहवाल घेऊन ज्या ठिकाणी त्रुटी आढळतील, त्या तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये, तसेच जलनिस्सारण व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशा स्पष्ट सूचना महापौरांकडून संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यावर या पाहणीदरम्यान विशेष भर दिला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड