
रायगड, 29 जून (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत 'विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ (SIR)' मोहीम राबविण्यात येणार असून, या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ ) मतदारांच्या घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करणार आहेत. या अधिकाऱ्यांना मतदारांनी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांतील २ हजार ७९० मतदान केंद्रांशी संबंधित २५ लाख ३३ हजार ७३९ मतदारांच्या नावांची व पात्रतेची सखोल पडताळणी केली जाणार आहे. पात्र नागरिकाचा मतदार यादीत समावेश व्हावा आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचे नाव यादीत राहू नये, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
३० जून ते २९ जुलैदरम्यान बीएलओ अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन मतदार अथवा त्यांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांचे सन २००२ मधील मतदार यादीतील तपशील असलेले गणना प्रपत्र दाखवतील. हा तपशील अचूक असल्याची खात्री मतदारांनी करून द्यावी. माहिती चुकीची असल्यास सन २००२ मध्ये नाव कोणत्या भागातील मतदार यादीत होते, याची माहिती देऊन बीएलओ अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.
मतदारांनी शक्य असल्यास गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINet अॅपवर सन २००२ मधील मतदार यादीतील आपला तपशील तपासून ठेवावा, असेही प्रशासनाने सुचविले आहे. सन २००२ च्या मतदार यादीत स्वतःचे किंवा आई-वडील अथवा आजी-आजोबांचे नाव असल्यास स्वतंत्र पुरावे सादर करण्याची गरज भासणार नाही. मात्र नाव उपलब्ध नसल्यास जन्मतारखेनुसार आवश्यक कागदपत्रे सुनावणीच्या वेळी मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागतील.
या कार्यक्रमानुसार ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. त्यावरील सुनावणी पूर्ण करून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंतिम निर्णयाविरोधात प्रथम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि त्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करण्याचीही तरतूद आहे.
मतदारांनी बीएलओ अधिकाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य केल्यास मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह होण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)