
परभणी, 29 जून (हिं.स.) : महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे (भा.प्र.से.) यांनी राज्यातील सर्व खाद्य व्यवसाय चालकांसाठी व्यापक अन्न सुरक्षा अनुपालन आदेश जारी केला असून, सुरक्षित अन्न – निरोगी महाराष्ट्र हा उद्देश साध्य करण्यासाठी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.या आदेशानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कॅन्टीन, स्वीट मार्ट, बेकरी, केटरिंग आस्थापना तसेच इतर सर्व खाद्य व्यवसायांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत निर्धारित नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
0
खाद्य व्यवसाय चालकांनी व्यवसायस्थळी मूळ FSSAI परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागात प्रदर्शित करणे, परिसरात स्वच्छता राखणे, कीटक नियंत्रणाची प्रभावी उपाययोजना करणे, ग्राहकांना सुरक्षित व मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे, वर्तमानपत्र किंवा छापील कागदामध्ये अन्नपदार्थ देणे अथवा पॅक करणे बंद करणे, तसेच कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी आणि FoSTaC प्रशिक्षण सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अ. ए. चौधरी यांनी २५ जून २०२६ रोजी परभणीतील हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कॅन्टीन, स्वीट मार्ट, बेकरी आणि केटरिंग व्यावसायिकांची बैठक हॉटेल राधिका पॅलेस येथे घेतली. यावेळी उपस्थितांना आदेशाची सविस्तर माहिती देऊन अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभर अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत दंडात्मक कारवाई, परवाना निलंबन किंवा रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व खाद्य व्यवसाय चालकांनी व्यापक अन्न सुरक्षा अनुपालन आदेशाचे तात्काळ व काटेकोर पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभाग, परभणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis