
परभणी, 29 जून (हिं.स.) : सन 2022-23 पासून सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणाऱ्या ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेसाठी सन 2026-27 या वर्षाकरिता जिल्हास्तर व राज्यस्तरावरील प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आदिवासी विकास विभागाने 03 फेब्रुवारी 2023 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ही योजना राबविण्यात येत असून हिंगोली व परभणी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी आणि पंचायत समित्यांना त्यांच्या अधिनस्त ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रस्तावांमध्ये आर्थिक मर्यादेनुसार कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून तो सादर करणे बंधनकारक आहे. तसेच प्रस्तावासोबत विविध आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. यामध्ये लोकसंख्या व आदिवासी लोकसंख्या प्रमाणपत्र, पाच वर्षांचा प्राधान्यक्रम आराखडा, अंदाजपत्रक, ग्रामपंचायतीचा बहुमत ठराव, ना हरकत प्रमाणपत्र, स्थळदर्शक नकाशा, जिओ-टॅग छायाचित्रे, तसेच संबंधित काम इतर कोणत्याही योजनेतून झाल्याचे नसल्याचे प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.
याशिवाय देखभाल-दुरुस्ती प्रमाणपत्र, जागेचा मालकी पुरावा (आठ-अ), ग्रामसेवक अहवाल, कार्यान्वयीन यंत्रणेचे प्रमाणपत्र, जादा खर्चाचे हमीपत्र आणि जागेबाबत कोणताही वाद नसल्याचे हमीपत्रही आवश्यक राहणार आहे.
सर्व संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव तयार करून 31 जुलै 2026 पूर्वी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी येथे सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis