
नांदेड, 29 जून (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगामार्फत सुरू करण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत लोहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण पार पडले.
लोहा तालुक्यातील पारडी येथील विक्री गार्डन मंगल कार्यालयात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमास एकूण 190 BLO व 19 पर्यवेक्षक उपस्थित होते. प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये घेण्यात आले. पहिल्या सत्रात BLO व पर्यवेक्षक यांना मार्गदर्शन करण्यात आले, तर दुसऱ्या सत्रात राजकीय पक्षांचे बूथ लेव्हल एजंट (BLA) यांचाही समावेश करण्यात आला.
या प्रशिक्षणात मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कंधार विलास नरवटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, लोहा यांनी गणना फॉर्म (Enumeration Form) वाटप, भरून घेणे, संकलन करणे तसेच डिजिटायझेशन प्रक्रियेबाबत PPT च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाचे नियोजन नायब तहसीलदार (निवडणूक) डॉ. संदीप हाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक महसूल अधिकारी राजेश गायंगी, महसूल सहायक बालाजी उटलवाड, सहशिक्षक ईश्वर धुळगंडे, महेंद्र कांबळे, संगणक चालक सुर्यकांत पांचाळ आणि श्रीरंग पोतदार यांनी केले.
या प्रशिक्षणास सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा गटविकास अधिकारी, लोहा श्री. कुलकर्णी यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis