
अमरावती, 29 जून (हिं.स.)
अमरावती जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध सावकारीच्या प्रश्नावर आज विधानसभेत आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी सरकारला धारेवर धरत कठोर कारवाईची मागणी केली. शेतकऱ्यांना जादा व्याजदराने कर्ज देऊन त्यांची बेकायदेशीर वसुली केली जात असल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडत असून काहींना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला.यावर उत्तर देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अमरावती जिल्ह्यात अवैध सावकारीच्या ३८४ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती दिली. त्यापैकी २६६ तक्रारींमध्ये तथ्य आढळले नाही, तर ३४ प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आल्याने संबंधित ४८ आरोपींवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.मंत्री पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यात अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय त्रिसदस्यीय प्रशासकीय समिती स्थापन केली जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीमार्फत पीककर्ज मंजुरी व वितरण प्रक्रियेवर नियमित देखरेख ठेवण्यात येईल.आ. खोडके यांनी शेतकऱ्यांना बँका आणि कायदेशीर वित्तीय संस्थांकडून सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध व्हावे, कर्ज प्रक्रियेतील अडथळे दूर करावेत तसेच विशेष सवलत योजना राबवाव्यात, अशी मागणी केली. त्याचबरोबर पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड सुविधेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला, याबाबतही त्यांनी सरकारकडे खुलासा मागितला.यासंदर्भात सहकार मंत्र्यांनी परवानाधारक सावकारांना व्याजदराचे फलक लावणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या शेतजमिनी व मालमत्ता मूळ शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देत, शेतकऱ्यांना कायदेशीर कर्जव्यवस्थेकडे वळवण्यासाठी जनजागृतीवरही भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी