प्रोटोकॉलला हरताळ? पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात निमंत्रणच नाही; प्रशासनाच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह
सोलापूर, 29 जून (हिं.स.)। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधा आणि विकासकामांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर व वाखरी परिसराचा दौरा केला. पालखी मार्ग, विसावा स्थळे, मुक्काम व्यवस्था तसेच विव
Jff


सोलापूर, 29 जून (हिं.स.)।

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधा आणि विकासकामांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर व वाखरी परिसराचा दौरा केला. पालखी मार्ग, विसावा स्थळे, मुक्काम व्यवस्था तसेच विविध विभागांच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला. या दौऱ्यात जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, उपाध्यक्षांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांना निमंत्रणच देण्यात आले नसल्याची बाब समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा संस्थेचा सर्वोच्च लोकप्रतिनिधी असताना, वारीसारख्या राज्यस्तरीय महत्त्वाच्या नियोजनाच्या पाहणी दौऱ्यात त्यांना वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, वारीसाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून मोठ्या प्रमाणावर सुविधा पुरविल्या जात असताना संबंधित संस्थेच्या अध्यक्षांनाच निमंत्रण न देणे हे प्रशासनातील समन्वयाच्या अभावाचे द्योतक असल्याची चर्चा सुरू आहे.

वारीच्या नियोजनात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद अपेक्षित असताना अध्यक्षांना डावलण्यात आल्याने हा केवळ संवादातील हलगर्जीपणा आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्ष, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भविष्यात अशा महत्त्वाच्या बैठका आणि पाहणी दौऱ्यांमध्ये सर्व संबंधित लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन प्रशासनाने काम करावे, अशी मागणीही व्यक्त होत आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना, मला कोणताही निरोप किंवा निमंत्रण मिळाले नाही. सन्मानाने बोलावले असते तर मी निश्चितच उपस्थित राहिलो असतो. निमंत्रणच नसल्यामुळे मी जिल्हा परिषदेतच थांबलो, असे स्पष्ट केले.

आता या प्रकरणात प्रशासनाकडून नेमके काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande