बीड-अहिल्यानगर रेल्वे प्रवास आता अडीच तासांत; दोन महिन्यांत काम पूर्ण होणार
बीड, 29 जून (हिं.स.)। अहिल्यानगर ते बीड या १६७ किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गावरील प्रवास आता अधिक वेगवान होणार असून, यापूर्वी लागणारा पाच तासांचा वेळ थेट अडीच तासांवर येणार आहे. या मार्गावरील इलेक्ट्रिकल रेल्वे सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले सिग्
बीड-अहिल्यानगर रेल्वे प्रवास आता अडीच तासांत; दोन महिन्यांत काम पूर्ण होणार


बीड, 29 जून (हिं.स.)।

अहिल्यानगर ते बीड या १६७ किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गावरील प्रवास आता अधिक वेगवान होणार असून, यापूर्वी लागणारा पाच तासांचा वेळ थेट अडीच तासांवर येणार आहे. या मार्गावरील इलेक्ट्रिकल रेल्वे सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले सिग्नल इंटरलॉकिंग आणि विद्युतीकरणाचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. भूसंपादनासंदर्भात काही शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारी उपविभागीय कार्यालयाकडून मार्गी लावण्यात आल्याने या कामातील प्रमुख अडथळे दूर झाले आहेत. सध्या बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर आणि बीड या प्रमुख स्थानकांच्या मार्गावर हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या प्रकल्पामुळे बीड-पुणे थेट रेल्वे सेवेचा मार्गही मोकळा झाला आहे. बीडवरून थेट पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता, रेल्वे विभागाकडून या विशेष सेवेचे नियोजन केले जात असून पुण्याच्या हडपसर रेल्वे स्थानकावर यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, परळी-बीड-अहिल्यानगर या संपूर्ण मार्गावरील देवदहिफळ भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा (मावेजा) प्रश्नही आता मिटला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येकी ५०-५० टक्के आर्थिक सहभागातून साकारल्या जाणाऱ्या या २६१ किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचा उपमुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून नियमित आढावा घेतला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande