
बीड, 29 जून (हिं.स.)।
पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सतर्कतेमुळे आणि धाडसी कारवाईमुळे रोखण्यात यश आले आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या बालविवाहाची माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत हुशारीने वेषांतर करून छापा टाकला. पोलीस आल्याची चाहुल लागताच मुलीला नवरदेवाच्या घरात लपवून हा गुन्हा दडपण्याचा हीन प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी अत्यंत कौशल्याने शोध घेत अल्पवयीन मुलगी आणि नवरदेव याला ताब्यात घेतले. या प्रकरणी ग्रामसेवकांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदाराकडून पाटोदा हद्दीत बालविवाह होत असल्याची पक्की माहिती मिळाली होती. याची गंभीर दखल घेत सहा. पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार पथकातील काही कर्मचाऱ्यांना वेषांतर करून घटनास्थळी पाठवले. लग्नघरातील लोकांनी पोलिसांना गुंगारा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु सतर्क पोलिसांनी कसून झडती घेत मुलगी आणि नवरदेवाला हुडकून काढले. प्राथमिक चौकशीत हा बालविवाहच असल्याचे उघड झाल्यानंतर, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामसेवकांना तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्ष बोलावून घेण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis