
नंदुरबार, 29 जून (हिं.स.) |जिल्ह्यातील नागरिकांना विविध प्रशासकीय, विकासात्मक व जनहिताच्या विषयांबाबत तसेच निवेदने व
तक्रारींसंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट अधिक सुलभ व नियोजनबद्ध पद्धतीने घेता यावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार 01 जुलै 2026 पासून प्रत्येक मंगळवार व गुरुवारी दुपारी 1.00 ते 2.00 यावेळेत नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेता येणार आहे.
यापूर्वी नागरिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट बुधवार व शुक्रवार या दिवशी दुपारी 1 ते 2 या वेळेत निश्चित करण्यात आली होती. मात्र कार्यालयीन कामकाजाचे प्रभावी नियोजन, विविध बैठका, क्षेत्रीय दौरे, लोकाभिमुख उपक्रम तसेच प्रशासकीय कामकाजातील सुसूत्रता लक्षात घेऊन या वेळापत्रकातबदल करण्यात आला आहे.सुधारित वेळापत्रकानुसार आता मंगळवार व गुरुवार या दिवशी दुपारी 1 ते 2 या वेळेत नागरिकांनी भेटीसाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व विभागप्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना या बदलाची माहिती देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधितबैठका, पत्रव्यवहार व भेटींचे नियोजन करताना या सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
विशेष व तातडीच्या प्रशासकीय बाबींमध्ये आवश्यकतेनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने अथवा संबंधित शाखेमार्फत स्वतंत्र वेळ निश्चित करून भेटीचे नियोजन करता येईल. सदर सुधारित वेळापत्रक 1 जुलै पासून लागू होणार असून, यापूर्वी या विषयासंदर्भात जारी करण्यात आलेले सर्व आदेश व सूचना रद्द समजण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर