
रत्नागिरी, 3 जून (हिं.स.) । एप्रिल २०२६ महिन्यात कोकण रेल्वेने नियमित तिकीट तपासणीसह एकूण ९३४ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवून ३७ हजार विनातिकीट व अनियमित प्रवाशांवर कारवाई केली. या कारवाईतून रेल्वे भाडे व दंडापोटी सुमारे २ कोटी ९० लाख रुपयांची वसुली करण्यात आली.
कोकण रेल्वेच्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकूण ११ हजार ३९४ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांदरम्यान ४ लाख ९९ हजार ६७५ विनातिकीट अथवा अनियमित प्रवास करणारे प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून रेल्वे भाडे व दंड स्वरूपात एकूण २७ कोटी ६८ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.
प्रवाशांच्या सुरक्षित, सुरळित आणि आरामदायी प्रवासासाठी कोकण रेल्वे प्रशासन कटिबद्ध असून, कोकण रेल्वे मार्गावर तिकीट तपासणी मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार आहेत. रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) तसेच रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने विशेष कारवाई केली जाणार आहे.
कोकण रेल्वेने सर्व प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे पालन केल्यास प्रवासादरम्यान होणारा त्रास टाळता येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी