माथाडी कामगारांसाठी ५० किलो वजन मर्यादा लवकरच लागू होणार; स्वतंत्र परिपत्रक जारी करण्याचे संकेत
अकोला, 03 जून (हिं.स.) :आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी केले जाणार आहे. या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश क
Photo


अकोला, 03 जून (हिं.स.) :आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी केले जाणार आहे. या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.

या संदर्भात केंद्रीय श्रम मंत्रालयाने ३० ऑगस्ट १९९९ रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीबाबत कामगार मंत्री फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत मंत्री फुंडकर म्हणाले की, माथाडी कामगार आणि व्यापारी संघटनांमध्ये या मुद्द्यावर कोणतेही मतभेद नाहीत. कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी ५० किलोपेक्षा जास्त वजनाची हाताळणी टाळण्याबाबत व्यापक जनजागृती आवश्यक आहे. राज्यात याबाबत परिपत्रक काढून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच इतर राज्यांमध्येही या नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या १५ एप्रिल २०२६ च्या परिपत्रकाचा उल्लेख करत, नाशिक जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ (लासलगाव) अंतर्गत येणाऱ्या बाजार समित्या, व्यापारी संघटना, ट्रान्सपोर्ट व्यवसाय व संबंधित आस्थापनांना ५० किलोपेक्षा जास्त वजनाची हाताळणी कामगारांकडून करून घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बैठकीस माजी आमदार व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, आयुक्त डॉ. एच.पी. तुम्मोड, संबंधित अधिकारी आणि माथाडी व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते

----------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande