
लातूर, 03 जून, (हिं.स.)। लातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख गोपी साठे यांनी अतिक्रमण हटवण्यासाठी गांधीगिरीचा मार्ग अवलंबल्याने शहरात या उपक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे. नेहमीप्रमाणे थेट कारवाई करण्याऐवजी अतिक्रमणधारकांना समजावून सांगत, स्वखुशीने अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गोपी साठे यांनी अतिक्रमणधारकांना फुले देऊन व नम्रपणे संवाद साधत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केल्याची माहिती समोर आली आहे.
मनपाच्या या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या सकारात्मक आणि लोकाभिमुख पद्धतीचे स्वागत केले असून, तर काहींनी अतिक्रमणासारख्या गंभीर प्रश्नावर कठोर कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
गोपी साठे यांच्या गांधीगिरीची शहरभर चर्चा रंगली असली, तरी या उपक्रमामुळे लातूर खरोखरच अतिक्रमणमुक्त होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis