
पुणे, 03 जून (हिं.स.)। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या युजर चार्जेसच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील व्यापारी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्यास 13 जूननंतर राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
दि पूना मर्चंट्स चेंबर येथे आयोजित राज्यव्यापी परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. परिषदेत महाराष्ट्रातील विविध भागांतील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रत्यक्ष उपस्थितीसह ऑनलाइन माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्यात आला. सुमारे 100 प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर राज्यभरातील विविध संघटनांच्या जवळपास 250 पदाधिकाऱ्यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला.
परिषदेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे, ‘फाम’चे अध्यक्ष जितेंद्र शाह, ‘कॅमेट’चे दीपेन अग्रवाल तसेच ‘ग्रोमा’चे अध्यक्ष भीमजी भानुशाली यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले.
यावेळी दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, प्रवीण चोरबेले, पोपटलाल ओस्तवाल आणि सचिन निवुंगणे यांनी युजर चार्जेसमुळे व्यापार क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांबाबत आपली भूमिका मांडली.
व्यापारी संघटनांनी युजर चार्जेसचा निर्णय व्यापारी आणि शेतकरी या दोन्ही घटकांसाठी घातक असल्याचा आरोप करत शासनाने तातडीने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु