
नाशिक, 03 जून, (हिं.स.)। नाशिक रिंग रोड प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेमधील त्रुटी व शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या मुद्द्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मुंबई येथे छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर व शेतकरी प्रतिनिधींनी भेट घेतली. यावेळी चुकीचे अलाइनमेंट, भूसंपादनातील त्रुटी, प्रशासनाची मनमानी आणि शेतकऱ्यांचे नुकसान याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांनी रिंग रोड अलाइनमेंटमध्ये काही बिल्डर, अधिकारी, राजकीय नेते व प्रभावशाली व्यक्तींना लाभ मिळावा यासाठी हेतुपुरस्सर बदल झाल्याचा संशय व्यक्त केला. तसेच भूसंपादनाशी संबंधित अधिकाऱ्यांनी परिसरात जमिनी खरेदी केल्याची बाबही मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी, “भूसंपादन प्रक्रियेत चुकीचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय झाला असेल तर दोषींवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः लक्ष घालीन,” अशी ग्वाही दिली. तसेच दर निश्चितीबाबत सक्षम प्राधिकरणासमोर शेतकऱ्यांनी प्रभावीपणे भूमिका मांडावी, असेही त्यांनी सांगितले.या भेटीमुळे नाशिक रिंग रोड प्रश्नावर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला नवे बळ मिळाले असून आगामी बैठकीत शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.यावेळी करण गायकर, सुभाष गायकर, भारत पिंगळे, ज्ञानेश्वर पालखेडे, वैभव दळवी, युवराज घाडगे, पृथ्वीराज उंबरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
विशेष म्हणजे,रिंग रोडच्या अलाइनमेंटमधील चुकीचे धोरण आणि नियोजनाबाबत त्यांनी गंभीर भूमिका घेत,योग्य तेच झाले पाहिजे;शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कोणतेही चुकीचे धोरण सहन केले जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश मंत्री भोसले यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV