एअर इंडिया इमारतीची पाहणी; दर्जेदार दुरुस्ती व नागरिकांच्या सोयीला सर्वोच्च प्राधान्य – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
मुंबई, 03 जून (हिं.स.) : मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारतीचे महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दि
एअर इंडिया इमारत पाहणी


मुंबई, 03 जून (हिं.स.) : मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारतीचे महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी मंत्री भोसले यांनी शासकीय कार्यालयांचे स्थलांतर करण्यापूर्वी इमारतीची सखोल स्ट्रक्चरल तपासणी करण्यात यावी तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतरच अंतर्गत सजावट व इतर विकासकामे हाती घेण्यात यावीत, असे निर्देश दिले.

कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता दीर्घकालीन टिकाऊपणा लक्षात घेऊन सर्व दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे करण्यात यावीत, असे सांगत त्यांनी विद्युत यंत्रणा, फिटिंग्ज आणि इतर तांत्रिक सुविधांसाठी उच्च दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यावर भर दिला.

इमारतीच्या मुख्य प्रवेशभागाचे महाराष्ट्राच्या वैभवाला साजेसे आकर्षक व सुशोभित स्वरूप विकसित करण्यात यावे. यासाठी देशातील नामांकित वास्तुविशारद व तज्ज्ञ संस्थांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयीन कामकाजासाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता, सुलभता आणि व्यवस्था ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे नमूद करत सर्व कामे निर्धारित कालावधीत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री भोसले यांनी दिले.

या मोक्याच्या जागेवरील इमारत खरेदीसाठी राज्य मंत्रिमंडळाने ८ सप्टेंबर २०२३ रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर विविध प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून राज्य शासनाने ‘एअर इंडिया असेट होल्डिंग कॉर्पोरेशन’ (AIAHL) कडून १६०१ कोटी रुपयांना ही वास्तू संपादित केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक निधी अदा केल्यानंतर २ जून २०२६ रोजी ही इमारत अधिकृतपणे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात घेण्यात आली.

या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता तातडीने प्रदान करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या ऐतिहासिक वास्तूमुळे राज्य शासनाच्या विविध कार्यालयांसाठी प्रशस्त, आधुनिक आणि सुसज्ज जागा उपलब्ध होणार असून, प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) श्री. आबासाहेब नागरगोजे, मुख्य अभियंता सौ. प्रज्ञा वाळके तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी मंत्री भोसले यांना इमारतीची सद्यस्थिती, आवश्यक दुरुस्ती व प्रस्तावित नूतनीकरण कामांबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “एअर इंडिया इमारतीचे राज्य शासनाकडे झालेले हस्तांतरण हा महाराष्ट्राच्या प्रशासकीय पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. गुणवत्तापूर्ण दुरुस्ती, दीर्घकालीन टिकाऊपणा आणि नागरिकांच्या सोयीला सर्वोच्च प्राधान्य देत या वास्तूचा आदर्श शासकीय संकुल म्हणून विकास करण्यात येईल.”

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande