
अकोला, 3 जून, (हिं.स.)। पावसाळा तोंडावर आला असताना शहरात संभाव्य दुर्घटना आणि अपघातांची संख्या वाढण्याची भीती लक्षात घेता, शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेने तात्काळ 'आपत्तीकक्ष' स्थापन करावा, अशी मागणी माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत विविध कारणांमुळे अपघात घडण्याची शक्यता असते. अशा बिकट परिस्थितीत नागरिकांना प्रशासनाकडून त्वरित आणि वेळेत मदत मिळणे अपेक्षित असते. लोकांच्या जीवाला सर्वोच्च महत्त्व देणे ही प्रशासनाची प्राथमिकता असायला हवी, असे जोशी यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे. पावसाळ्यात झाडे पडणे, जलमय स्थिती निर्माण होणे किंवा रस्ते अपघात यांसारख्या घटना घडतात. अशा वेळी मदतीसाठी एक खंबीर यंत्रणा तैनात असणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनपा प्रशासनाने स्वतःहून पुढे येऊन चोवीस तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरू करावा. शिकस्त इमारतींची शहरातील संख्या पाहता त्यातील रहिवाशांना खाली करण्याची गरज आहे. अन्यथा मोठा अपघात होण्याची भिती व्यक्त केली गेली आहे. माजी नगरसेवक गिरीश जोशी यांच्या या मागणीनंतर आता महापालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी शहरात आपत्ती व्यवस्थापनासाठी काय पावले उचलते, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. पावसाळ्यात नेहमीच शहरवासींयाचे तारांबळ उडत असते, शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने शहरवासीयांना या पाण्यातूनच मार्ग काढावा लागतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे