
अकोला, 03 जून (हिं.स.)।
महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा समाचार घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी महायुतीमध्ये कोण लहान आणि कोण मोठं याला जितकं महत्त्व आहे, तितकंच संख्याबळालाही असतं. संख्याबळानुसार निश्चितच आम्ही लहान भाऊ आहोत, यात दुमत नाही. पण भाऊ मोठा की लहान यामध्ये वैचारिक प्रगल्भता आणि विचारधारा या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. लहान भाऊ सुद्धा घरामध्ये तितकाच महत्त्वाचा असतो जितका मोठा भाऊ असतो. अब्दुल सत्तार हे राज्याचे माजी मंत्री असूनही पुत्रप्रेमापोटी अशा पद्धतीची विधाने करत आहेत, जी महायुती धर्माला पटणारी नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
२०२९ च्या विधानसभा निवडणुकीला अजून वेळ असून, तेव्हा आम्ही बरोबरीचे भाऊ ठरतो की मोठे भाऊ, हे सिद्ध करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अजित दादा महायुतीत आले तेव्हा ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. सध्या सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री आहेत, मात्र अर्थखात्याबाबत मुख्यमंत्री यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थखात्यावर अधिकार असतानाही हे खाते अजूनही भारतीय जनता पक्षाकडेच ठेवण्यात आले आहे. ही मिळणारी वागणूक अत्यंत वेदनादायी आहे, अशा शब्दांत मिटकरींनी आपली खंत बोलून दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जे अर्थखाते होते, ते लवकरात लवकर पक्षाला परत देण्यात यावे आणि महायुती स्थापन करताना दिलेला शब्द नेत्यांनी पाळावा, अशी आग्रही मागणी मिटकरी यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे