आपले सरकार पोर्टलवरील सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्यासाठी मनसेचे पालकमंत्र्यांना निवेदन
अकोला, 03 जून (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील विविध ऑनलाइन सेवा मागील काही दिवसांपासून बंद अथवा विस्कळीतपणे सुरू असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्म
Photo


अकोला, 03 जून (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील विविध ऑनलाइन सेवा मागील काही दिवसांपासून बंद अथवा विस्कळीतपणे सुरू असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी, अकोला तसेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन सादर करून पोर्टलवरील सर्व सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, वय-राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, शॉप अॅक्ट नोंदणी, विविध परवाने, ई-केवायसी तसेच इतर अनेक महत्त्वाच्या शासकीय सेवांसाठी नागरिकांना आपले सरकार पोर्टलवर अवलंबून राहावे लागते. मात्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामे, व्यावसायिकांची कागदपत्रे, शासकीय योजनांचे अर्ज तसेच दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे.

अकोला जिल्ह्यातील नागरिकांकडून यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने संबंधित विभागाशी समन्वय साधून या तांत्रिक समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात यावे व पोर्टलवरील सर्व सेवा सुरळीतपणे सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच सेवा पूर्ववत सुरू होईपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले असून नागरिकांच्या अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहराध्यक्ष सौरभ भगत, उपशहराध्यक्ष मुकेश धोंडफळे, अमोल भेंडारकर, हर्षल अंभोरे व मोहन अंभोरे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande