
अकोला, 03 जून (हिं.स.)।
गोरगरीब नागरिकांना रेशन धान्य पुरवठ्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्या पुरवठा निरीक्षकानेच बाजार मूल्यानुसार तब्बल २ कोटी ४० लाख ४८ हजार रुपयांच्या शासनाच्या रेशन धान्यावर डल्ला मारल्याची धक्कादाय बाब अमरावती जिल्ह्यात उघडकीस आल्याने या धान्य गैरव्यवहार प्रकरणाचे पडसाद आता मूर्तिजापूर तालुक्यातही उंमटू लागले आहेत.
या प्रकरणातील निलंबित तात्कालीन पुरवठा निरीक्षक अधिकारी चैताली यादव यांच्या मूर्तिजापूर येथील सण २०१९ ते २०२४ या वार्षिक कार्यकाळातील व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी विभागीय तपास यंत्रणा सक्रिय झाली असून या काळातील पुरवठा विभागात काम करणारे सर्व कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार व चैताली यादव यांच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी करण्याच्या कार्याला वेग आलाय, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील नोंदीचे कसून छाननी सुरू असल्याची माहिती समोर येत असून जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ४ हजार २८६ क्विंटल धान्याच्या कठीत अपहारामुळे शासनाला मोठा आर्थिक फटका बसल्याचे जिल्हा पुरवठा विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. २७ मार्च २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या अंतिम अहवालात शासनाचे २ कोटी ४०: लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपास पथकाकडून धान्य उचल नोंदी, लाभार्थी यादी, वितरण रजिस्टर, ई पास व्यवहार, गोदामातील कागदपत्रांची पडताळणी त्याच प्रमाणे लाभार्थ्यांना नवीन राशन कार्ड वितरण यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे अनेक व्यवहारांची फेर तपासणी सुरू असल्याने चौकशीचा फास अधिक घट्ट होत असल्याचे चित्र असून या चौकशीत कर्मचारी व स्वस्त धान्य दुकानदारांच्या डोक्यावर लटकती तलवार असल्याचे बोलल्या जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे