
अकोला, 03 जून (हिं.स.)।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीने अकोला रेल्वे स्थानकावर अतिरिक्त महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी पक्षाचे प्रदेश संघटक सचिव जावेद जकारिया यांनी अकोल्याचे खासदार अनूप धोत्रे यांना निवेदन सादर केले. यावेळी पक्षाचे महानगराध्यक्ष रफीक सिद्दीकी, सामाजिक कार्यकर्ते इरशाद हुसैन, इमरान सिद्दीकी तसेच सुफियान डोकाडिया उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अकोला हे विदर्भातील एक महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक व सामाजिक केंद्र असून येथून दररोज हजारो प्रवासी देशातील विविध भागांत प्रवास करतात. मात्र, काही महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना अकोला येथे थांबा नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, ज्या गाड्यांना अकोला येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे त्या गाड्या नागपूरनंतर थेट भुसावळपर्यंत आणि परतीच्या प्रवासात भुसावळनंतर थेट नागपूरपर्यंत धावतात. या दरम्यान अकोलासारखे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असूनही या गाड्यांना थांबा नसल्याने विदर्भातील प्रवाशांना त्याचा लाभ मिळत नाही.
मागणी करण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत –
पुणे – संतरागाछी हमसफर एक्सप्रेस (20821/20822)
पुरी – गांधीधाम सुपरफास्ट एक्सप्रेस (12993/12994)
सूरत – संतरागाछी सुपरफास्ट एक्सप्रेस (22827/22828)
पुणे – हावडा दुरंतो एक्सप्रेस (12221/12222)
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खासदार अनूप धोत्रे यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना अकोला येथे थांबा मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय झाली असून अकोल्याच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
निवेदन स्वीकारताना खासदार अनूप धोत्रे यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत लवकरच रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून या विषयाचा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. अकोला रेल्वे स्थानकाला या महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे मिळावेत यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
या मागणीची पूर्तता झाल्यास अकोला व परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून पूर्व व पश्चिम भारताशी रेल्वे संपर्क अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे