
परभणी, . 3 जून (हिं.स.): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील भूमिहीन आणि दारिद्र्यरेषेखालील शेतमजुरांना 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती शेतजमीन उपलब्ध करून दिली जाते. या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील शेतजमीन विक्री करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
योजनेनुसार, कोरडवाहू शेतजमिनीसाठी प्रति एकर कमाल 5 लाख रुपये तर बागायती शेतजमिनीसाठी प्रति एकर कमाल 8 लाख रुपये मोबदला जिल्हास्तरीय समितीमार्फत वाटाघाटी करून देण्यात येतो.
शेतजमीन विक्रीसाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी किंवा व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्जासोबत 7/12 उतारा, नमुना 8-अ, 100 रुपयांच्या बाँड पेपरवरील नोटरीकृत शपथपत्र, भूमिअभिलेख कार्यालयाचा पोटहिस्सा मोजणी अहवाल, तलाठी यांचे निविवाद प्रमाणपत्र, मूल्यांकन प्रमाणपत्र, बँकांचे बेबाकी प्रमाणपत्र, कुटुंबीयांची नाहरकत प्रमाणपत्रे तसेच मागील 13 वर्षांतील फेरफार संबंधित पुरावे आदी आवश्यक कागदपत्रे जोडून प्रस्ताव सादर करावेत.
हे प्रस्ताव सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, परभणी येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना, शपथपत्रांचे नमुने व अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त आर. एच. एडके यांनी केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis