
बीड, 03 जून (हिं.स.)।गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता कार्यालय आष्टी तालुक्यातील जळगाव येथे नव्याने सुरू करण्यात आले असून, या मुख्यालयाचा उद्घाटन समारंभ आ. सुरेश धस यांच्या हस्ते फीत कापून उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
आष्टी तालुक्यासह परिसरातील सिंचन, जलसंपदा आणि भूसंपादनाशी संबंधित विविध प्रशासकीय कामे अधिक प्रभावीपणे व जलदगतीने पार पडावीत, या उद्देशाने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या स्थापनेमुळे शेतकऱ्यांना विविध कामांसाठी दूरवर जावे लागणार नसून, त्यांच्या अनेक प्रश्नांचे निराकरण स्थानिक पातळीवरच होणार आहे. यावेळी बोलताना आ. सुरेश धस यांनी सांगितले की, जलसंपदा विभागाची यंत्रणा तालुकास्तरावर उपलब्ध झाल्याने भूसंपादन प्रक्रिया, कालवा व्यवस्थापन, सिंचनाशी संबंधित तांत्रिक बाबी तसेच विविध विकासकामांना गती मिळेल. विशेषतः खुटेफळ साठवण तलावात उपसा सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला या कार्यालयामुळे चालना मिळणार आहे. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता वाढून परिसरातील कृषी विकासाला मोठी मदत होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis