
नामांकन रद्द करण्याचा निर्णय कायम
अमरावती, 03 जून (हिं.स.) : अमरावती विधान परिषद निवडणुकीत आणखी एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांना नागपूर खंडपीठातूनही कोणताही दिलासा मिळालेला नाही. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचे नामांकन अर्ज रद्द केल्यानंतर त्या निर्णयाविरोधात बाजोरिया यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने सुनावणीनंतर ही याचिका फेटाळून लावत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले.
बाजोरिया यांच्या वतीने अॅड. रेणुका शिरपूरकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. दरम्यान, इतर तीन उमेदवारांच्या वतीनेही ‘कॅव्हेट’ दाखल करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती प्रफुल्ल कुंभलकर यांनी अमरावती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचे नमूद करत बाजोरिया यांची याचिका नामंजूर केली.
भाजपचे उमेदवार तथा माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. सुनील मनोहर यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांना ऍड. प्रशांत देशपांडे, ऍड. चंद्रकांत गोरले, ऍड. संदीप गुप्ता, ऍड. रोहित उपाध्याय आणि ऍड. सुमित शर्मा यांनी सहकार्य केले. तर काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांच्या वतीने ऍड. भांगडे यांनी युक्तिवाद केला. तसेच अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले यांच्या वतीने ऍड. ऋषिकेश मार्डीकर यांनी न्यायालयात भूमिका मांडली. नामांकन रद्द करण्याचा निर्णय कायम असल्याचा निर्णयानंतर बाजोरिया पिता पुत्र तातडीने दिल्ली कडे रवाना झाले आहेत. ते आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी