
अमरावती, 03 जून (हिं.स.) | मासोद गावात गेल्या अनेक वर्षांपासून बाहेरून मोठ्या प्रमाणात आणून टाकण्यात येणाऱ्या राखेमुळे नागरिकांचे जीवन अक्षरशः धुळीला मिळाले असून गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावाच्या परिसरात टाकण्यात येणारी राख वाऱ्यामुळे संपूर्ण गावात पसरते. अनेक वेळा धुळीचे प्रमाण इतके वाढते की रस्तेही दिसेनासे होतात. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेक लहान-मोठे अपघात घडल्याचेही नागरिकांनी सांगितले.
या राखेमुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. गावात राख आणणे व टाकणे तत्काळ बंद करावे तसेच यापूर्वी साठवून ठेवलेल्या राखेची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतने ग्रामसभा व मासिक बैठकीत याबाबत ठराव मंजूर करून संबंधितांना नोटीस बजावावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी