
छत्रपती संभाजीनगर, 3 जून (हिं.स.) : जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला आवश्यक असलेल्या सर्व लसी वेळेत मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय लसीकरण टास्क फोर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगल पांचाळ, समाज कल्याण अधिकारी बी. जी. अरवत, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला भांबरे, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, रोटरी क्लब व लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते.
एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृतीची गरज
जिल्हाधिकारी म्हणाले की, मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरणाचे प्रमाण जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा कमी आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी आरोग्य व शिक्षण विभागाने समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. शाळांमध्ये विशेष पालक सभांचे आयोजन करून या लसीबाबत जनजागृती करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
कमी लसीकरण असलेल्या तालुक्यांवर विशेष भर
वैजापूर, संभाजीनगर, सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यांमध्ये बीसीजी व पोलिओ लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. या भागांमध्ये विशेष मोहीम राबवून एचपीव्ही, बीसीजी तसेच गोवर-रुबेला लसीकरणाचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.
‘पोलिओ मुक्त भारत’ अभियानांतर्गत 28 जून 2026 रोजी जिल्हाभर विशेष पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत बूथ स्तरावर तसेच घरोघरी जाऊन बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे.
शिक्षण, अंगणवाडी, आरोग्य विभाग, विविध सामाजिक संस्था आणि एनएसएसच्या सहकार्याने ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. रेल्वे स्थानके, बस स्थानके, ग्रामीण भाग आणि स्थलांतरित कामगारांच्या वस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पावसाळ्यातील आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ओआरएस पावडर, झिंक आणि इतर आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
पालकांना पुढाकार घेण्याचे
आवाहन
पालकांनी आपल्या मुलींचे एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे तसेच पोलिओ, बीसीजी आणि गोवर-रुबेला लसीकरणासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा. जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन मुलांचे वेळेत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis