राज्यातील धरणांतील वाढत्या उष्णतेचा जलसाठ्यावर परिणाम; पिण्याच्या पाण्याला प्राधान्य
पुणे, 03 जून, (हिं.स.) - एल निनो’चा प्रभाव, वाढते तापमान आणि पावसातील अनिश्चितता यामुळे राज्यातील कमी होत असलेला पाणीसाठा चिंतेचा विषय ठरत आहे. सध्या उन्हाळी हंगाम सुरू असल्याने उपलब्ध जलसाठ्याचा वापर शेती सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठीही केला
Pavan dam


पुणे, 03 जून, (हिं.स.) - एल निनो’चा प्रभाव, वाढते तापमान आणि पावसातील अनिश्चितता यामुळे राज्यातील कमी होत असलेला पाणीसाठा चिंतेचा विषय ठरत आहे. सध्या उन्हाळी हंगाम सुरू असल्याने उपलब्ध जलसाठ्याचा वापर शेती सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठीही केला जात आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढण्याची शक्यता असून त्यामुळे जलसाठ्यावर अतिरिक्त ताण येण्याची भीती व्यक्त होत आहे. हवामान विभागाने २०२६ च्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अखंडित राहावा यासाठी जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागांना पिण्याच्या पाण्याचे आरक्षण सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याच्या आकडेवारीनुसार पुणे विभागातील ७२४ धरणांमध्ये केवळ ९७.६० टीएमसी म्हणजे १८.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून हा राज्यातील सर्वात कमी साठा आहे. याउलट अमरावती विभागातील धरणांमध्ये ५६.६१ टीएमसी (४०.८३ टक्के) आणि नागपूर विभागात ६३.९२ टीएमसी (३८.३६ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. कोकण विभागातील १७३ धरणांमध्ये ४४.११ टीएमसी (३३.७२ टक्के), नाशिक विभागातील ५३९ धरणांमध्ये ६०.५० टीएमसी (२८.७७ टक्के) तर छत्रपती संभाजीनगर विभागातील ९२९ धरणांमध्ये ७८.०७ टीएमसी (३०.३४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. मोठ्या धरणांच्या स्थितीकडे पाहिल्यास पुणे जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणीसाठा उणे ११.४८ टीएमसी म्हणजे उणे २१.४३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या कोयना धरणात १०.७५ टीएमसी (१०.७४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. तर मराठवाड्याचे जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणात २५.१७ टीएमसी म्हणजे ३२.८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे विभागातील कमी होत चाललेला जलसाठा आणि उजनी धरणातील उणे पातळी ही आगामी काळात पिण्याचे पाणी व सिंचन व्यवस्थापनासाठी मोठी चिंता ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande