
परभणी, 03 जून (हिं.स.)। “शेतकरी फक्त जगू नये, तर समृद्ध व्हावा” हा विचार घेऊन ध्रुव साकोरे यांनी “मिशन प्राणा” ही संकल्पना पुढे आणली आहे. मराठवाड्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबतच शाश्वत आणि दीर्घकालीन उत्पन्नाचा नवा मार्ग मिळावा; यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शेतीमध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्यासाठी ध्रुव साकोरे यांनी विविध संस्थांशी चर्चा करून सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या, तसेच संयुक्त राष्ट्रसंघ (UN) पुरस्कार प्राप्त सिद्धेश साकोरे संस्थापक “ॲग्रो रेंजर्स” संस्थेला या उपक्रमाशी जोडले आहे. मिशन प्राणा अंतर्गत शाश्वत फळबाग लागवड (Agroforestry) प्रकल्पासाठी सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिश्र पद्धतीची फळबाग लागवड, मोफत मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि शेतीसाठी आवश्यक तांत्रिक मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आंबा, पेरू, चिकू, मोसंबी यांसारख्या विविध फळझाडांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना भविष्यात स्थिर आणि अतिरिक्त उत्पन्नाचा आधार मिळणार आहे.आज अनेक तरुण शेतीपासून दूर जात असताना, “मिशन प्राणा” हा उपक्रम शेतीकडे नव्या आशेने पाहण्याची प्रेरणा देणारा ठरत आहे. पर्यावरण संवर्धन, मातीची सुपीकता, जैवविविधता आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण यांचा समतोल साधत मराठवाड्यात हरितक्रांती घडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.ध्रुव साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा उपक्रम भविष्यात परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
मराठवाड्यात हरितक्रांती आणण्यासाठी एकजुटीने कार्य करूया - ध्रुव साकोरे
मराठवाड्यात कसदार शेती असून येथील शेतकरी कष्टाळू आहे. याचा योग्य फायदा घेवून पारंपारिक शेती सोबतच शाश्वत आणि दीर्घकालीन उत्पन्नाचा नवा मार्ग मिळवण्यासाठी एकजुटीने कार्य करून या भागात हरितक्रांती आणूया; असे ध्रुव साकोरे यांनी बोलताना स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis