
अमरावती, 03 जून (हिं.स.) : येथील ‘मॉसिकॉल’ कारखान्याच्या मौल्यवान जमिनीच्या भवितव्याबाबत मंत्रालय, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित जमिनीची खाजगी विक्री टाळून ती सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आरक्षित ठेवण्याच्या विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अमरावती शहराच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने या जमिनीचे महत्त्व लक्षात घेऊन विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संभाव्य उपयोग, नियोजन आणि कायदेशीर बाबींचा आढावा घेतला. शहरातील नागरिकांच्या हिताचे संरक्षण होण्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी या जागेचा उपयोग कसा करता येईल, यावरही विचारमंथन करण्यात आले.
बैठकीत अमरावतीच्या दीर्घकालीन विकासाला चालना देणारे पर्याय आणि सार्वजनिक मालमत्तेचे जतन करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. तसेच भविष्यातील निर्णय घेताना स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा आणि शहराच्या विकास आराखड्याचा विचार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.यावेळी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीतील चर्चेनंतर या जमिनीच्या वापराबाबत पुढील धोरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी