
बीड, 03 जून (हिं.स.)। धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी वेग घेत असतानाच, सोमवारी महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व मित्रपक्षांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या या अर्जावेळी आष्टी-पाटोदा-शिरूर कासार मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीनंतर यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या विजयाचे राजकीय गणित धस यांच्या खांद्यावर सोपवले जाण्याची चर्चा अधिकच गडद झाली आहे.दि. १८ जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी एकूण ९८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यात ४९९ पुरुष व ४८९ महिला सदस्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे बीड जिल्हा परिषद अस्तित्वात नसल्याने यंदा जिल्हा परिषद सदस्य मतदान प्रक्रियेपासून दूर आहेत. त्यामुळे नगरपरिषद व नगरपंचायतींमधील सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास २६२ मतांचे संख्याबळ यंदा महत्त्वाचे मानले जात आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, आष्टी-पाटोदा-शिरूर कासार या नगरपंचायतींमध्ये मिळून सुमारे ५७ सदस्यांचे संख्याबळ आहे. त्यापैकी ५२ पेक्षा अधिक सदस्य आमदार सुरेश धस यांच्या प्रभावातील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
याशिवाय वडवणी, अंबाजोगाईसह काही इतर भागांतील सदस्यांशीही त्यांचे प्रभावी राजकीय संबंध असल्याचे बोलले जाते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील समन्वय, मतांचे व्यवस्थापन आणि 'बेरजेच्या राजकारणा'त धस यांची भूमिका महायुतीसाठी निर्णायक ठरू शकते, असे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis