
नांदेड, 03 जून (हिं.स.)। शिक्षकांवर वाढत चाललेले बीएलओ (बीएलओ), जनगणना, निवडणूक कामे तसेच विविध ऑनलाइन अहवाल सादर करण्याच्या जबाबदाऱ्यांमुळे शिक्षण व्यवस्थेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. अध्यापनाबरोबरच प्रशासकीय कामांचा वाढता ताण शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
सध्या शाळांना उन्हाळी सुट्टया सुरू असल्या तरी शिक्षकांना विविध शालेय पूर्वतयारी, विद्यार्थ्यांच्या नोंदी अद्ययावत करणे, ऑनलाइन माहिती भरणे आणि शासकीय अहवाल सादर करणे यांसारख्या कामांमध्ये व्यस्त राहावे लागत आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळातही त्यांना पुरेशी विश्रांती मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. शिक्षणतज्ज्ञांच्या मते, प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम असणे आवश्यक आहे. सततच्या कामाच्या तणावामुळे शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis