
जळगाव , 03 जून (हिं.स.) जूनच्या पहिल्याच दिवशी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यातील तब्बल २८३ गावांमधील ५ हजार ७८७ शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले असून, सुमारे ३ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रावरील केळी, लिंबू, पपई, मोसंबी आणि इतर पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद प्रशासनाकडे झाली आहे.या अवकाळी संकटात पारोळा तालुक्यातील एका शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला असून पाच दुधाळ जनावरांचाही मृत्यू झाला आहे. भडगाव येथे एका बैलाचाही वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याशिवाय जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ५५ घरे आणि एका झोपडीचेही नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, यावल, भडगाव, चोपडा आणि इतर तालुक्यांतील केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी केळीची झाडे मुळासकट कोसळली तर काही भागांत फळधारणा झालेल्या बागाही उद्ध्वस्त झाल्या. विशेषतः रावेर तालुक्यातील ८७ गावांमधील २,११४ शेतकऱ्यांचे १,५३५ हेक्टरवरील केळी पीक बाधित झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात १,०७७ शेतकऱ्यांचे ६३८ हेक्टरवरील केळी पीक नुकसानग्रस्त झाले आहे.वादळी वाऱ्यामुळे केवळ केळीच नव्हे तर लिंबू, पपई आणि मोसंबी बागांनाही मोठा फटका बसला आहे. भडगाव, पारोळा आणि चाळीसगाव परिसरातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.३० मे रोजी यावल, रावेर, जळगाव, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा आणि भडगाव तालुक्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला. त्यानंतर ३१ मे रोजी ८३ गावांतील १,७८६ शेतकरी बाधित झाले.तर १ जून रोजी जिल्ह्यातील १८० गावांमध्ये ३,९२२ शेतकऱ्यांचे तब्बल २,५४० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.महसूल व कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. आधीच वाढते उत्पादन खर्च, कमी बाजारभाव आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा अवकाळी पाऊस मोठा आर्थिक धक्का ठरला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेत मदत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर