
लातूर, 03 जून (हिं.स.)।
हेल्मेटचा वापर टाळणे आणि बेफिकीर वाहनचालना यामुळे लातूर जिल्ह्यात दोन दिवसांत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये एका माजी सरपंचासह दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा समावेश असून या घटनांमुळे तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून रस्ते सुरक्षा, हेल्मेटचा वापर आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबत सातत्याने जनजागृती केली जात असली तरी निष्काळजीपणामुळे अपघाती मृत्यूंचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे या घटनांवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ जून रोजी सायंकाळी नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील चौकात झालेल्या अपघातात पंडित नामदेव पवार (वय ५७) रा. शंकरनगर तांडा, ता. चाकूर यांचा मृत्यू झाला. तक्रारदार वैजनाथ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच-२४-बीडब्ल्यू-०३५७ क्रमांकाच्या वाहनाच्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंडित पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते आपल्या भागातील माजी सरपंच म्हणून परिचित होते.
दरम्यान, बुधवारी सकाळी लातूर शहरातील पीव्हीआर चौक परिसरात आणखी एक दुर्दैवी अपघात घडला. सीईटी परीक्षेच्या वर्गासाठी जात असताना मोटारसायकल आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार संबंधित अल्पवयीन मुलाने पालकांना न सांगता दुचाकी घेतली होती. वेगाने जात असताना हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.
दोन्ही घटनांमध्ये एक समान बाब प्रकर्षाने पुढे आली असून ती म्हणजे सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष. प्राथमिक तपासात संबंधितांनी हेल्मेटचा वापर केला नसल्याचे समोर आले आहे. रस्ते अपघातांमध्ये डोक्याला होणारी गंभीर दुखापत हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरत असल्याचे अनेक घटनांतून सिद्ध झाले आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना दुचाकी चालविताना चालकासह मागील आसनावरील व्यक्तीनेही हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट वापरणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आणि मद्यपान करून वाहन चालविणे टाळणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
याशिवाय पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी किंवा चारचाकी वाहनांची चावी देऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. अल्पवयीन वाहनचालना ही केवळ कायद्याचा भंग नसून ती स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करू शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis