ट्रॅक्टरधारकांना कॅनमध्ये डिझेल द्या; युवा स्वाभिमानचे निवेदन
अमरावती, 03 जून, (हिं.स.) - आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर भातकुली व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, रासायनिक खते आणि कृषी यंत्रसामग्रीसाठी आवश्यक डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी युवा स्वाभिमान पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडे
खरीप हंगामापूर्वी बियाणे-खते उपलब्ध करा; ट्रॅक्टरधारकांना कॅनमध्ये डिझेल द्या – युवा स्वाभिमानचे निवेदन


अमरावती, 03 जून, (हिं.स.) - आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर भातकुली व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, रासायनिक खते आणि कृषी यंत्रसामग्रीसाठी आवश्यक डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी युवा स्वाभिमान पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

७ जूनपासून खरीप हंगामास प्रारंभ होत असून शेतकरी सध्या नांगरणी, वखरणी, बांधबंदिस्ती व इतर पेरणीपूर्व कामांमध्ये व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत विविध प्रकारच्या सोयाबीन व कापूस बियाण्यांसह डीएपी, युरिया, १०-२६-२६ यांसारख्या रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री केली जाऊ शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

युवा स्वाभिमान पार्टीने कृषी विभागामार्फत सर्व कृषी सेवा केंद्रांवर पुरेशा प्रमाणात दर्जेदार बियाणे व खते उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच काळाबाजार, साठेबाजी आणि शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी विशेष तपासणी पथके नियुक्त करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, शेती मशागतीची कामे वेगाने सुरू असल्याने ट्रॅक्टर, जेसीबी व अन्य कृषी यंत्रसामग्रीसाठी डिझेलची गरज वाढली आहे. मात्र अनेक पेट्रोल पंपांवर डपकी कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील शेतजमिनी पेट्रोल पंपांपासून दूर असल्याने कृषी कामांसाठी डपकी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभाग व पेट्रोल पंप चालकांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी भातकुली तालुकाप्रमुख मंगेश इंगोले, अमरावती तालुकाप्रमुख अजय घुले, देवानंद राठोड, उद्धवराव कराळे, संतोष मोटघरे, मिलिंद अवघड, श्रीकृष्ण बैलमारे, भूषण वाने, नीरज गवई, विजय मेश्राम, माणिक मंदावणे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande