नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५३७ पुनर्वसन सदनिकांचे ५ जूनपासून पात्र रहिवाशांना वितरण
* पुनर्वसन इमारत क्रमांक ०१ मधील टॉवर क्र. १ ते ३ ला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त मुंबई, 03 जून (हिं.स.) - आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पूर्ण झालेल्या पुनर्वसन
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प


* पुनर्वसन इमारत क्रमांक ०१ मधील टॉवर क्र. १ ते ३ ला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त

मुंबई, 03 जून (हिं.स.) - आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पूर्ण झालेल्या पुनर्वसन इमारत क्रमांक ०१ मधील टॉवर क्र. १, २, व ३ मध्ये ५३७ पात्र रहिवाशांना पुनर्वसन सदनिकांच्या वितरणास शुक्रवार, दि. ०५ जून, २०२६ पासून नायगाव-दादरमधील टॉवर क्रमांक पाचच्या तळ मजल्यावरील म्हाडा प्रकल्प कार्यालयात प्रारंभ करण्यात येणार आहे.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता म्हाडा सुकाणू अभिकरण (नोडल एजन्सी) आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधील पुनर्वसन इमारत क्रमांक ०१ मधील टॉवर क्र. १ ते ३ ला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सदर विंगमधील ५३७ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मंडळातर्फे करण्यात येणार असून यावेळी सर्व पात्र रहिवाशांना वितरण पत्र प्रदान करण्यात येणार आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते सायंकाळी ०६.०० वाजता सार्वजनिक सुट्टी सोडून सदर वितरण पत्रांचे वाटप केले जाणार आहे. वितरण पत्र/ ताबा स्वीकारतेवेळी लाभार्थ्यांनी पुनर्वसन सदनिका करारनामा, आधार कार्ड व पॅन कार्डची छायांकीत प्रत, संक्रमण शिबीर सदनिकाधारकांचे हमीपत्र (रु. ५००/- च्या स्टँप पेपरवर नोंदणीकृत नोटरी केलेले), सदनिकाधारकांचे पासपोर्ट साईजचे ३ नविन रंगीत फोटो, पुनर्वसित सदनिकेमध्ये सोबत वास्तव्य करणा-या कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो (पोस्टकार्ड साईज) या आवश्यक कागदपत्रांसह रहिवाशांनी व्यक्तीशः उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

त्याचबरोबर मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, निवासी सदनिकांचे वितरण टॉवर क्रमांक २, १, व ३ या क्रमाने करण्यात येणार असून वितरण पत्र स्वीकारण्याबाबतचे वेळापत्रक वरील नमूद ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानुसार, सदनिकाधारकांनी वरील ठिकाणी स्वतः उपस्थित राहून सदनिकेचे वितरण पत्र स्विकारावे व त्यानंतर सदनिकेचा ताबा घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’असे नामकरण करण्यात आले आहे. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात दोन पुनर्वसन इमारतीत एकूण २० टॉवर बांधण्यात येत आहेत. यात पुनर्विकास प्रकल्पाच्या पुनर्वसन इमारत क्रमांक ०१ मधील एकूण ८ टॉवर्सपैकी ५ टॉवर्समधील ८६४ सदनिकांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १६ मार्च, २०२६ रोजी करण्यात आले.

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या ६.४५ हेक्टर जागेवर तळ अधिक ३ मजल्यांच्या ४२ चाळींमध्ये ३३४४ भाडेकरू वास्तव्यास आहेत. दोन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात २३ मजल्यांच्या २० पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. चाळींतील रहिवाशांचे तात्पुरत्या संक्रमण शिबिरात स्थलांतरण करण्यात आले आहे. तसेच चाळीतील रहिवाशांना भाडे किंवा संक्रमण गाळे यापैकी पर्याय निवडण्याचा विकल्प उपलब्ध करून देण्यात आला. निवासी व अनिवासी गाळेधारकास २५ हजार रुपये प्रति महिना ११ महिन्यांचे आगाऊ भाडे देण्यात येत आहे.

सुमारे दोन ते तीन पिढ्यांपासून १६० चौरस फुटाच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना म्हाडामार्फत पुनर्वसन इमारतीत ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त २ बीएचके स्वरुपातील सदनिका मालकी तत्त्वावर विनामुल्य वितरित केली जाणार आहे. पुनर्वसन सदनिकेत व्हिट्रीफाईड टाईल, अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या, ग्रानाईट स्वयंपाकाचा ओटा, अग्निरोधक यंत्रणा यासह ब्रांडेड प्लंबिंग फिटिंग्स आदी सारख्या अनेक सुविधा देण्यात आल्या असून भूकंप रोधक तंत्रज्ञानवर आधारित उभारलेल्या या इमारतींमध्ये दोन पॅसेंजर लिफ्ट, एक फायर लिफ्ट, सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत ३ मजल्यांचे बेसमेंट पार्किंग, स्टील्ट एरिया आणि प्रशस्त जिने आहेत.

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एक स्वयंपूर्ण वसाहतीचे निर्माण होणार असून यामध्ये स्वतंत्र शाळेची इमारत, स्वतंत्र वेलफेअर सेंटर आदी सुविधांचे नियोजन करण्यात आले असून मलनिस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रणाली, पर्जन्यजल संचयन आदी सुविधा असणार आहेत. तसेच या प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींच्या सामायिक सोयी सुविधांची 'म्हाडा'तर्फे बारा वर्षे देखभाल केली जाणार आहे.

‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली व मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मिलिंद बोरीकर यांच्या नियोजनामुळे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला विशेष वेग मिळाला आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मुंबईतील वरळी, ना.म. जोशी मार्ग-परळ, नायगाव येथील सुमारे ८६ एकरवर वसलेल्या सुमारे २०७ चाळींचा समावेश आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत १२१ जुन्या चाळींतील ९ हजार ६८९ रहिवाशांचे पुनर्वसन होणार असून या प्रकल्पात ४० मजल्यांच्या ३४ पुनर्वसन इमारती उभारण्यात येत आहेत. ना. म. जोशी मार्ग-परळ प्रकल्पामध्ये २ हजार ५६० निवासी व अनिवासी गाळे असून १४ पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत. नायगाव (दादर) येथे ३ हजार ३४४ निवासी व अनिवासी गाळे असून २० पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande