
जगद्गुरु नरेंद्राचार्यांसह वैष्णव आखाड्यांच्या प्रमुखांची उपस्थिती
नाशिक, 03 जून (हिं.स.)।
, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्या ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याचे आयोजन गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ, नाशिक यांच्या वतीने करण्यात आले असून हा सोहळा गुरुवार, दि. ११ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून संपन्न होणार आहे.या धार्मिक कार्यक्रमासाठी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणीजधाम यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभ शिलान्यास पूजनाचा सोहळा पार पडणार आहे. रामानंदाचार्य नरेंद्राचार्य हे वैष्णव आखाड्यांचे जगद्गुरु रामानंदाचार्य असल्याने वैष्णव आखाड्यांच्या सर्व प्रमुखांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबरच दिगंबर अनी आखाड्याचे वैष्णवदास महाराज, महंत माधवदास महाराज, निर्वाणी अनी आखाड्याचे महंत मुरलीधरदास महाराज, महंत मोहनदास महाराज, निर्मोही अनी आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज, महंत रामजीदास महाराज, मंगल पीठाधीश्वर माधवाचार्य महाराज, महंत भक्तीदास महाराज, रामकिशोरदास शास्त्री आणि महंत रामस्नेहीदास उपस्थित राहणार आहेत.सिंहस्थाच्या तयारीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून या ध्वजस्तंभ शिलान्यास पूजनामुळे आगामी कुंभमेळ्याच्या धार्मिक कार्यांना विधिवत प्रारंभ होणार आहे. वैदिक मंत्रोच्चार, संत-महंतांचे आशीर्वाद आणि धर्मपरंपरेच्या साक्षीने संपन्न होणारा हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV