पुणे आरटीओकडून आकर्षक वाहन क्रमांकांसाठी नवीन नोंदणी मालिका जाहीर
पुणे, 03 जून (हिं.स.) : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पुणे येथे मालवाहतूक, टुरिस्ट टॅक्सी, बस व ऍम्ब्युलन्स या परिवहन संवर्गातील वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच खाजगी वाहनांसाठी आकर्षक व पसं
पुणे आरटीओकडून आकर्षक वाहन क्रमांकांसाठी नवीन नोंदणी मालिका जाहीर


पुणे, 03 जून (हिं.स.) : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पुणे येथे मालवाहतूक, टुरिस्ट टॅक्सी, बस व ऍम्ब्युलन्स या परिवहन संवर्गातील वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच खाजगी वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित शुल्क (तीनपट व नियमित शुल्क) भरून मिळवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

इच्छुक अर्जदारांनी 4 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळेत डिमांड ड्राफ्ट, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतींसह अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्यांची यादी 5 जून रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल. त्याच दिवशी दुपारी 4.30 वाजता लिलाव प्रक्रिया पार पडेल.

तसेच मालवाहू, टुरिस्ट टॅक्सी, बस व ऍम्ब्युलन्स संवर्गातील वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी 5 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज परिवहन विभागात जमा करावेत. या अर्जांसाठीही एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास 8 जून रोजी सकाळी 10.30 वाजता यादी जाहीर करण्यात येईल व त्याच दिवशी दुपारी 4.30 वाजता लिलाव प्रक्रिया होईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. राखीव क्रमांक मिळाल्यानंतर 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणी न केल्यास तो क्रमांक रद्द केला जाईल व भरलेली फी शासन खात्यात जमा होईल. तसेच कोणत्याही परिस्थितीत भरलेली फी परत केली जाणार नाही किंवा समायोजित केली जाणार नाही, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी स्पष्ट केले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande