
अमरावती, 03 जून (हिं.स.) | अमरावती मॉडेल रेल्वेस्थानक ते राजकमल चौक दरम्यान प्रस्तावित नव्या उड्डाणपुलाच्या संकल्पचित्राला (डिझाईन) रेल्वे विभागाने अखेर हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आराखड्यात काही किरकोळ त्रुटी आढळून आल्याने अंतिम आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
राजकमल चौक ते रेल्वे स्थानकादरम्यानचा विद्यमान रेल्वे उड्डाणपूल जीर्ण झाल्यामुळे ऑगस्ट २०२५ पासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नव्या उड्डाणपुलाच्या उभारणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या आराखड्याला प्राथमिक मंजुरी दिल्यानंतर तो रेल्वे विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी या संकल्पचित्राला मान्यता दिली. मात्र, पुलाच्या उतरणीच्या मार्गांशी संबंधित काही तांत्रिक बाबींमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे निदर्शनास आले आहे. मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी रेल्वे स्थानक चौक, राजकमल चौक, रायली प्लॉट आणि हमालपुरा परिसरातील प्रस्तावित मार्गांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी आराखड्यातील किरकोळ त्रुटी दुरुस्त करून आठवडाभरात परिपूर्ण आणि अंतिम आराखडा सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमुळे सध्या आचारसंहिता लागू असल्याने प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला तात्पुरता विलंब झाला आहे. आचारसंहिता समाप्त होताच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागातील सूत्रांनी दिली.या प्रकल्पाचे संपूर्ण बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. रेल्वे विभागाची मंजुरी मिळाल्याने प्रकल्पाला गती मिळणार असून, अंतिम आराखडा तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच रेल्वे स्थानक परिसरातील संपर्क अधिक सुलभ करण्यासाठी हा उड्डाणपूल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी